अजितदादा मुख्यमंत्री झाले तर मी स्वत: त्यांच्याकडे जाईल, पण...; रोहित पवारांच्या विधानाने खळबळ
काकांचे कौतुक करताना रोहित पवारांनी चिमटाही लगावला, वाचा नेमकं काय म्हणाले दादांविषयी
Maharashtra Assembly Election : 2024 अजितदादा मुख्यमंत्री होत असतील तर मी स्वतः जाऊन त्यांना फुलांचा गुच्छ देईल. पुतण्या म्हणून त्यांचा आशीर्वाद देखील घेईल, असे वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केले आहे. तसेच ईव्हीएम च्या मुद्द्यावरून रोहित पवारांनी महायुती सरकारवर टीका देखील केली आहे. महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएममध्ये अडकत आहे का? असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे.
RCC New
रोहित पवार म्हणाले, एकनाथ शिंदे केंद्रात जातील आणि त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होतील, असे दिसत आहे. मात्र, अजितदादा मुख्यमंत्री होणार असतील तर मी स्वतः जाऊन त्यांना फुलांचा गुच्छ देईल. पुतण्या म्हणून त्यांचा आशिर्वाद देखील घेईल, असे रोहित पवार म्हणाले. दरम्यान, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातील नेत्यांनी देखील अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. मात्र, मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत देवेंद्र फडणवीस यांचे नाव आघाडीवर आहे.
महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएम मध्ये अडकत आहे का?
रोहित पवार यांनी महायुतीवर देखील टीका केली आहे. रोहित पवार म्हणाले, महाराष्ट्राची लोकशाही गुजरातच्या ईव्हीएम मध्ये अडकत आहे का? लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोगाने समोर आले पाहिजे, असेही रोहित पवार यांनी म्हंटले आहे. महाराष्ट्रातील हे राज्य देशातील विकसित राज्य आहे. बहुमत असताना देखील महाराष्ट्राचा निर्णय घेण्यासाठी दिल्लीला जावे लागत आहे, असा टोला देखील रोहित पवारांनी लगावला आहे.
Sakhi
ईव्हीएमचे पोस्टमार्टम करावे लागेल
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले, येवला मतदारसंघातून छगन भुजबळ निवडून आले आहेत, त्यांचे मी अभिनंदन करतो. ईव्हीएम मॅनेज झाले नसेल म्हणून ते 26 हजार मतांनी निवडून आले असतील, असा टोला रोहित पवारांनी लगावला आहे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांमध्ये कार्यकर्ते खचून जाऊ नयेत म्हणून मी लढत आहे. निवडणूक आयोगाला ऐकावे लागेल आणि ईव्हीएमचे पोस्टमार्टम करावे लागेल. ईव्हीएमच्या विरोधात सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्र आले पाहिजे आणि लढले पाहिजे, असेही रोहित पवार म्हणाले.