माफी मागा, अन्यथा शंभर कोटींचा दावा ठोकेल; विनोद तावडेंची राहुल गांधी, सुप्रिया सुळेंना नोटीस
नेमकं प्रकरण काय, कशावरुन पाठवली नोटीस, 'काँग्रेसवर तावडेंनी काय केले आरोप, वाचा संपूर्ण प्रकरण
विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी भाजपचे सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर 5 कोटी रुपये वाटल्याचे आरोप झाले. तर विनोद तावडे यांनी हे सगळे आरोप फेटाळून लावले. मात्र विरोधकांकडून त्यांच्यावर वारंवार टीका करण्यात येत आहे. त्यामुळे विनोद तावडे यांनी राहुल गांधी, मल्लिकार्जुन खर्गे आणि सुप्रिया सुळे यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. बिनशर्त माफी मागा, अन्यथा 100 दावा ठोकरणार, असा इशारा विनोद तावडे यांनी दिला आहे.
RCC New
मतदारांची दिशाभूल करताना मला, भाजपला बदनाम करायचे. नरेंद्र मोदी यांना मुद्दामहून या प्रकरणात ओढायचे. काँग्रेसच्या नेत्यांनी हे बदनामीचे षडयंत्र रचले. त्याच्याविरोधात काँग्रेसच्या नेत्यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी माझी, माझ्या पक्षाची सार्वजनिक माफी मागावी किंवा न्यायिक प्रक्रियेला सामोरे जा, असा इशारा विनोद तावडे यांनी दिला आहे.
'काँग्रेसचे काम फक्त खोटे पसरवणे!'
भाजप सरचिटणीस विनोद तावडे यांनी काँग्रेस नेत्यांना बजावलेल्या नोटिसीच्या प्रती शेअर करताना ट्विटरवर लिहिले, “काँग्रेसचे काम फक्त खोटे पसरवणे आहे! खोट्या नालासोपारा प्रकरणात मी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि पक्षाच्या प्रवक्त्या सुप्रिया सुळे यांना बदनामीची नोटीस पाठवली आहे, कारण त्यांनी या प्रकरणात खोटेपणा पसरवून माझी आणि भारतीय जनता पक्षाची प्रतिमा खराब केली आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांच्या तपासात 5 कोटी रुपयांची कथित रक्कम सापडली नाही, हे सत्य सर्वांसमोर आहे. हे प्रकरण काँग्रेसच्या खालच्या पातळीवरील राजकारणाचे प्रमाण आहे.
नेमके प्रकरण काय?
विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी बहुजन विकास आघाडीने विनोद तावडे यांच्यावर 5 कोटी रुपये वाटल्याचा आरोप केला होता. बीव्हीएचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर आणि त्यांचा मुलगा क्षितीज 19 नोव्हेंबर रोजी विरार येथील एका हॉटेलमध्ये पोहोचले. याठिकाणी विनोद तावडे नालासोपारा येथील भाजपचे उमेदवार राजन नाईक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेत होते. तावडे हॉटेलमध्ये पाच कोटी घेऊन पोहोचले असून मतदारांना पैसे वाटले जात असल्याचा आरोप बीव्हीएने केला होता. या प्रकरणावरुन राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती.