विधानसभा निकालावर शरद पवारांची प्रतिक्रिया, पराभवाची कारणं सांगितली अन्...
बटेंगे तो कटेंगे पासून लाडकी बहीण योजनेवरही केले भाष्य, चिंतन करणार असल्याचे प्रतिपादन
Sharad Pawar on Maharashtra Assembly Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 : राज्यात विधानसभा निवडणुकीचे निकाल शनिवारी लागले. महायुतीला महाराष्ट्रातील जनतेला भरभरून मतदान केलं. तर महाविकास आघाडीला अवघ्या ६० जागा देखील गाठता आल्या नाही.
RCC New
दरम्यान, कालच्या निकालानंतर महाविकास आघाडीचे बडे नेते तथा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पहिल्यांदाच निकालावर प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार कराड येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. जशी अपेक्षा होती तसा हा निर्णय नाही, शेवटी लोकांनी दिलेला हा निर्णय आहे, पराभव का झाला याची माहिती घेणे, त्याची कारणमीमांसा करणे आणि नव्या जोमाने पुन्हा लढावे, असे ते म्हणाले. तर बटेंगें तो कटेंगे या घोषणांमुळे मतांचे ध्रुवीकरण झाले, असा दावा देखील त्यांनी केला.
बटेंगे तो कटेंगे मुळे ध्रुवीकरण
लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या गटाला लोकांनी मतदान केले. मात्र विधानसभा निवडणुकीत मात्र अजित पवारांना मोठ्या मतांनी निवडून दिले आहे. यावर बोलताना शरद पवार म्हणाले, हे असे का झाले यावर अभ्यास करणे गरजेचे आहे. तसेच पुढे बोलताना शरद पवार म्हणाले, अधिकृत माहिती आल्याशिवाय इव्हीएम मशीनवर बोलणार नाही. बटेंगे तो कटेंगे अशा घोषणांमुळे राज्यात मतांचे ध्रुवीकरण करण्यात आले, असा आरोप शरद पवारांनी महायुतीवर लावला आहे.
पुन्हा नव्या जोमाने कामाला लागणार
अजित पवार आणि युगेंद्र पवार यांची तुलना होऊ शकत नाही, अजित पवारांना यश मिळाले हे मान्य करण्यात गैर काही नाही, असे स्पष्ट मत शरद पवारांनी व्यक्त केले आहे. लोकांनी दिलेल्या निर्णयाचा अभ्यास करणार तसेच घरी बसणार नाही, नव्या जोमाने पुन्हा लढणार, कर्तुत्ववान नवी पिढी तयार करणार, असा विश्वास देखील शरद पवारांनी व्यक्त केला आहे. आमच्यातून बाहेर गेलेल्यांना निवडणुकीत चांगले यश मिळाले. महाविकास आघाडीला देखील चांगला प्रतिसाद मिळत होता. विरोधी पक्ष नेते पदावर बसण्यासाठी तेवढे संख्याबळ नसल्याचे देखील खंत त्यांनी व्यक्त केली.