एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होणार नाहीत, शिवसेनेच्या आमदाराने केला दावा
सीएम राहिलेला व्यक्ती डीसीएम होणे कितपत योग्य, महायुतीत नेमकं काय शिजतंय?
Maharashtra Assembly Election : 2024 महायुतीच्या नव्या सरकारमध्ये एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची कोणतीही शक्यता नाही, असा दावा शिवसेनेचे प्रवक्ते तथा आमदार संजय शिरसाट यांनी केला आहे. कदाचित एकनाथ शिंदे महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार नाहीत. कारण, मुख्यमंत्री राहिलेल्या व्यक्तीने उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणे योग्य ठरणार नाही, असे ते म्हणालेत.
RCC New
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. पण निकाल लागून 4 दिवस लोटले तरी महायुतीला अद्याप आपले सरकार स्थापन करता आले नाही. यावरून वेगवेगळे तर्कवितर्क सुरू असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय आमदार संजय शिरसाट यांनी नव्या मंत्रिमंडळात एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची शक्यता फार कमी असल्याचा दावा केला आहे.
शिंदेंऐवजी अन्य एखादा नेता होईल उपमुख्यमंत्री
एकनाथ शिंदे यांचा महायुतीच्या नव्या सरकारमध्ये समावेश होण्याची शक्यता आहे. पण ते कदाचित उपमुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री पदावर असणाऱ्या व्यक्तीने पुन्हा उपमुख्यमंत्रीपदावर जाणे योग्य ठरणार नाही. त्यामुळे शिवसेना एकनाथ शिंदे वगळता आपल्या अन्य एखाद्या नेत्याची उपमुख्यमंत्रीपदी नियुक्ती करण्याची सूचना करेल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले आहे.
शिंदेंची मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीतून माघार
उल्लेखनीय बाब म्हणजे महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात लढवली. त्यामुळे तेच महायुतीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असतील असे मानले जात होते. पण प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक 132 जागा आल्या. त्यामुळे भाजपने या पदावर दावा सांगण्यास सुरुवात केली आहे. यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा होती. पण शिंदेंनी बुधवारी स्वतः पत्रकार परिषद घेत आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपला पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा घेतील त्या निर्णयाला पाठिंबा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्री होण्याचा मार्ग मोकळा झाल्याचा दावा केला जात आहे. यासंबंधी आज एखादा ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे.
Sakhi
नव्या मंत्रिमंडळात कोणत्या पक्षाला काय मिळणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, नव्या मंत्रिमंडळात भाजप स्वतःकडे अर्ध्याहून अधिक खाती ठेवणार. तर शिवसेनेला 3 मोठ्या खात्यांसह 12 कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. त्यातुलनेत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 9 कॅबिनेट मंत्रिपदे मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळात किमान 43 मंत्री असू शकतात. त्यामुळे शिंदेंना शहर विकास, सार्वजनिक बांधकाम व जल संसाधनासारखे प्रमुख खाते मिळण्याची शक्यता आहे.