छोटे पक्षच किंगमेकर ठरणार - महादेव जानकर
महायुती आणि महाविकास आघाडीसमोर ठेवली अट
विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी राजकीय पक्षांकडून संख्याबळाची जमवाजमव केली जात आहे. यंदाच्या निवडणुकीत छोटे पक्ष आणि अपक्षांना महत्व राहणार आहे. अशात राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी छोटे पक्षच किंगमेकर ठरणार असल्याचे म्हटले आहे. तसेच रासपचा पाठिंबा हवा असल्यास मंत्रिमंडळात सामील करावे, अशी अट देखील महायुती आणि महाविकास आघाडीसमोर ठेवली आहे.
RCC New
महादेव जानकर एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्रातील तमाम मतदार बंधू-भगिनींचे आभार मानतो. लोकशाहीच्या उत्सवामध्ये मतदारांचा टक्का वाढल्यामुळे अभिनंदन करतो. हा वाढलेल्या टक्क्यामुळे परिवर्तन होण्याची शक्यता असू शकते. मागील विधानसभा निवडणुकीत एक आणि वरच्या सभागृहात एक असे आमचे दोन आमदार होते. पण आता आमचे दोनाचे चार, चाराचे सहा होतील. जनतेचा कौल शेवटी, त्यांच्या हातात आहे. राष्ट्रीय समाज पक्षाला चांगले यश मिळेल, असा मला विश्वास आहे.
आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरू
कोणासोबत जाणार यावर बोलताना महादेव जानकर म्हणाले, मेजॉरिटी महाविकास आघाडी किंवा महायुतीला असेल तर आमचा कोणाला विरोध असेल असे नाही. आम्ही दोघांसोबतही जायला तयार आहोत. सध्यातरी 50-50 टक्के दोघांची शक्यता आहे. आम्ही सध्या महायुती किंवा महाविकास आघाडी बरोबर नाही. आम्ही छोटे पक्ष असल्यामुळे किंगमेकरची भूमिका निभावणार आहोत.
महादेव जानकरांच्या अटी काय?
महादेव जानकर म्हणाले की, आम्हाला महाविकास आघाडी किंवा महायुतीकडून कोणाचे निमंत्रण किंवा फोन आलेला नाही आणि आम्ही बिन बुलाय कोणाकडे जाणार नाही. आम्हाला मंत्रिमंडळात भागीदारी पाहिजे. आमची इच्छा आहे, आमचे जर 12 आमदार आले तर 12 चे 12 कॅबिनेट मंत्री झाले पाहिजे. आणि जर दोघांना वाटले तर मुख्यमंत्रीपण आमचा पक्षाचा झाला पाहिजे. त्यांनी हे मान्य केले, तर आम्ही त्यांचे स्वागत करू. तुम्ही आम्हाला सपोर्ट करावा”, अशा अटी महादेव जानकर यांनी ठेवल्या आहेत