जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार यांना खोचक टोला : म्हणाले - गुलाबी रंग फक्त लग्नात चालतो राजकारणात नव्ह
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शुक्रवारी गुलाबी जॅकेटवरून उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. गुलाबी रंग केवळ लग्नात चालतो, बाकी कुठेही चालत नाही. वाजंत्री वगैरेही या रंगाचे कपडे घालून फिरतात, असे ते म्हणालेत. बारामती मतदारसंघातून आमदार म्हणून युगेंद्र पवार हेच एका मतानेही का होईना निवडून येतील असा दावाही त्यांनी यावेळी केला.
RCC New
288 सदस्यीय महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी मतदान झाले. त्यानंतर आता शनिवारी मतमोजणी होऊन राज्यात कुणाचे सरकार येणार? हे स्पष्ट होणार आहे. या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवार यांच्यावर निशाणा साधत राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. ते म्हणाले की, राज्यात महाविकास आघाडीचेच सरकार येणार आहे. आमच्या 160 हून अधिक जागा निवडून येतील. बारामतीत युगेंद्र पवार एका मताने का होईना, आमदार होतील.
भाजपकडून सध्या अपक्ष आमदारांना मोठी ऑफर दिली जात आहे. कारण, त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे. या पक्षाने निवडणुकीतही कोटींच्या कोटी वाटले. त्यानंतर आताही ते पैसेच पैसे वाटत आहेत. भाजपला याहून दुसरे काहीही येत नाही.
गुलाबी जॅकेट फार चालत नाही
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी गुलाबी जॅकेटवरून अजित पवार यांनाही खोचक टोला हाणला. गुलाबी रंग केवळ लग्नात चालतो. हा रंग वाजंत्री वगैरे घालून फिरतात. इतर कुठेही हा रंग चालत नाही, असे ते म्हणाले. शरद पवार यांनी मला जे काम करण्यास दिले ते मी करेन. मी आतापर्यंत त्यांना काहीही मागितले नाही. यापुढेही कधी मागणार नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
नारायण राणेंच्या विधानाचाही घेतला समाचार
जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी शरद पवार निवडणूक निकालानंतर महायुतीसोबत जाणार असल्याचा दावा करणाऱ्या नारायण राणे यांचाही समाचार घेतला. नारायण राणे यांना आमचा सल्ला आहे की, त्यांनी स्वतः किती पक्ष बदलले हे पहावे. तीन पक्ष बदलणाऱ्या माणसाने शरद पवारांना सांगू नये. त्यांनी आपले स्वतःचे पहावे, असे आव्हाड म्हणाले.