मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंना खेचून आणलं, कोल्हापूरात काय घडला राडा!
उमेदवारी माघार घेण्यावरुन कोल्हापूरात रंगला वाद, सतेज पाटील संतापले!
कोल्हापूर : अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी कोल्हापुरात जोरदार राजकीय राडा झाल्याचे पाहायला मिळाला. कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार मधुरिमाराजेंनी शेवटच्या क्षणी अर्ज मागे घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
महाविकास आघाडी आणि सतेज पाटलांसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कारण, मधुरिमाराजेंच्या अर्ज माघारीसाठी प्रत्यक्ष शाहू महाराजांचाच दबाव असल्याचं समोर आलं.
शाहू महाराजांच्या आदेशानंतर मालोजीराजेंनी मधुरिमाराजेंचा हात पकडत बाहेर आणलं आणि उमेदवारी अर्ज माघारी घेतला. त्या ठिकाणाचा एक व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
एकाच घरात दोन पंद नकोत..!
कोल्हापूर उत्तर विधानसभेसाठी आधी माजी नगरसेवक राजू लाटकर यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. मात्र काँग्रेसने एका दिवसात उमेदवारी बदलली आणि मधुरिमाराजे छत्रपती यांना उमेदवारी दिली. मात्र एकाच घरात दोन दोन पदं नको अशी भूमिका शाहू महाराजांची होती अशी माहिती आहे. त्यामुळेच शाहू महाराजांच्या आदेशानंतर मधुरिमाराजे छत्रपती यांनी शेवटच्या क्षणी आपली उमेदवारी मागे घेतल्याची चर्चा आहे.
मला कशाला तोंडघशी पाडलं?
यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सतेज पाटलांचा पारा मात्र चांगलाच चढल्याचं दिसून आलं. त्यांनी शाहू महाराजांसमोर नाराजी व्यक्त केली. लढायचं नव्हतं तर आधीच सांगायचं होतं, मला कशाला तोंडघशी पाडलं असं त्यांनी विचारलं. माझी फसवणूक केली, हे काही बरोबर झालं नाही असंही ते म्हणाले.
ज्या लोकांनी आग लावण्याचं काम केलं त्यांना सोडणार नाही असा दमही सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या अवती-भोवती असणाऱ्या लोकांना दिला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातून बाहेर आल्यानंतरही ते भडकले. 'जर तुमच्यात दम नव्हता तर कशाला उभं राहिलात, मी पण माझी ताकद दाखवली असती' असं सतेज पाटलांनी शाहू महाराजांच्या जवळच्या लोकांना उद्देशून म्हटलं आहे.