संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
वाल्मीक कराडच्या जामिनावरील सुनावणी लांबली, ऑनलाईनद्वारे सर्व आरोपींची झाली सुनावणी
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपी सध्या एसआयटीच्या ताब्यात आहेत. या सर्व आरोपींची एसआयटी कोठडी आज संपल्यानंतर या आरोपींना आज बीड येथील जिल्हा न्यायालयात व्हिसीद्वारे हजर केले गेले. तसेच एसआयटीकडून या सर्व आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्याची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार या आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेले सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, सिद्धार्थ सोनवणे या तिघांची 14 दिवसांची कोठडी आज संपली. तर प्रतिक घुले, महेश केदार, जयराम चाटे यांची देखील बारा दिवसांची कोठडी संपत असल्याने या सर्व आरोपींना व्हिसीच्या माध्यमातून न्यायालयामध्ये हजर केले गेले.
सध्या या सर्व आरोपींना वेगवेगळ्या पोलिस ठाण्यातला लॉकअप मध्ये ठेवण्यात आले होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव यासाठीच्या पथकाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष हजर न करता विशेष व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले गेले.
Dhages
यामधील दोन आरोपी हे तलवाडा पोलिस ठाण्यात आहेत. तर दोन गेवराई तर दोन माजलगाव पोलिस ठाण्यामध्ये आहेत. या सर्व आरोपींना या पोलिस ठाण्यामधूनच व्हिसीद्वारे न्यायालयात हजर केले आहे. मात्र, या सुनावणीत न्यायालयाने या आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यामध्ये सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे या प्रकरणातील मुख्य आरोपी असून सिद्धार्थ सोनवणे याने संतोष देशमुख यांचे लोकेशन सांगितले असल्याचा आरोप आहे.
वाल्मीक कराडचा जेलमधील मुक्काम वाढला
संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणीच्या गुन्ह्यात अटक असलेला वाल्मीक कराड याला देखील मकोका लावण्यात आला आहे. त्यानंतर वाल्मीक कराडला सात दिवसांची कोठडी सुनवण्यात आली आहे. मात्र वाल्मीक कराडला जिल्हा सत्र न्यायालयाने कोठडी सुनावल्यानंतर कोर्टामध्ये लगेच जामीनासाठी अर्ज दाखल केला होता.
या अर्जाला सीआयडी पथकाकडून कोर्टात आव्हान देण्यात आले आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी वाल्मीक करडचा असलेला संबंध? याची चौकशी करायची असल्याने त्याला जामीन देण्यात येऊ नये अशी विनंती सीआयडीने न्यायालयाकडे केली आहे. यात जामीन अर्जावर आज केजच्या जिल्हा व सत्र न्यायालया समोर सुनावणी होणार होती. त्यावर होणारी सुनावणी पुन्हा लांबली आहे.