वाल्मिक कराडवर 'मकोका', अन् परळी तापली; आईचे आंदोलन, कार्यकर्त्यांचे बंदचे आवाहन!

परळीत दिवसभरात काय-काय घडलंं, संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी कसा जोडला संबंध, जाणून घ्या सर्व काही

On
वाल्मिक कराडवर 'मकोका', अन् परळी तापली; आईचे आंदोलन, कार्यकर्त्यांचे बंदचे आवाहन!

महाराष्ट्र राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराडवर अखेर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरण आणि हत्येच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. 

तत्पूर्वी, केज कोर्टाने वाल्मीक कराडला 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्यानंतर झालेल्या एका स्वतंत्र सुनावणीत त्याचा ताबा एसआयटीला मिळाल्याची  माहिती देण्यात आली. दरम्यान, वाल्मीक कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली आहे. त्यामुळे दिवसभर परळीतील वातावरण चांगलेच तापलेले होते. 

SIT ला मिळाली वाल्मीक कराडची कोठडी

हत्येच्या गुन्ह्यात वाल्मीक कराडचा ताबा घेण्याची परवागनी एसआयटीला मिळाली आहे. जेलमध्ये प्रोडक्शन वॉरंट दाखवून एसआयटी त्याचा ताबा घेणार आहे. हत्येच्या गुन्ह्यात सीआयडीने प्रोडक्शन वॉरंट जारी केले आणि कोर्टाने ते मंजूर केले. त्यामुळे सीआयडीकडे वाल्मिक कराडचा ताबा मिळाला आहे. दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणावर वाल्मिक कराड याच्या पोलीस कोठडीसाठी उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाईल.

खासदार सोनवणे यांचे शांततेचे आवाहन

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हे सर्व आरोपी मकोकामध्ये सामील होतील, असा विश्वास बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केला. पोलिसांच्या तपासात जे कुणी सापडत असतील, तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असेही ते म्हणाले. प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे. बीड जिल्ह्यात तणाव निर्माण होणार नाही. तणाव निर्माण करण्याचा विषय काय आहे? बीड जिल्ह्यातील जनतेने शांतता बाळगावी, असे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

कायद्याच्या कचाट्यात येणाऱ्यांना सोडले जाणार नाही; सुरेश धसांचा हल्लाबोल

वाल्मीक कराडवर मकोका लागल्यानंतर भाजप आमदार सुरेश धस यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. एसआयटीने जे काही काम केले आहे, जी काही या तपासात प्रगती होत आहे, त्यात कोर्टाची ऑर्डर असते. त्यात याने मागणी केली, त्याने मागणी केली याचा विषयच नाही, असे धस म्हणाले. राज्य सरकारने आता जी एसआयटी नेमली आहे, त्यांनी त्यांचे काम दाखवले आहे. आता कायद्याच्या कचाट्यात जे काही सापडतील, त्यांना सोडले जाणार नाही, असेही धस यांनी म्हटले. 

Dhages

आता तपासाला योग्य दिशा मिळेल - अंजली दमानिया

वाल्मीक कराडवर मकोका लावला. एसआयटीने त्याला मकोका कोर्टातही नेले, हे ऐकून बरे वाटते. आता तपासाला योग्य दिशा मिळेल, असा विश्वास अंजली दमानिया यांनी व्यक्त केला. खंडणी आणि संतोष देशमुख हत्या दोन्ही वेगवेगळे नव्हते. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातूनच झाली होती हे आता सिद्ध होईल, असेही त्या म्हणाल्या. वाल्मीक कराडला पोलिस कोठडी न देता न्यायालयीन कोठडी दिली ही गोष्ट मला खटकत असल्याचे दमानिया यांनी म्हटले. 

परळी बंदची हाक, अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद

वाल्मीक कराडवर मकोका लावल्याची बातमी समजताच कराड समर्थकांकडून परळी शहर बंदची हाक देण्यात आली. 10 मिनिटाच्या आत वाल्मीक कराडच्या समर्थनार्थ परळीतील दुकाने बंद करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहेत. अत्यावश्यक सेवा वगळता, सर्व आस्थापना बंद करण्यात आल्या आहेत. दरम्यान, नेमके काय झाले याबाबत माहिती नाही. सर्वांनी दुकाने बंद केल्यामुळे आम्ही पण आमचे दुकान बंद केल्याचे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

वाल्मीक कराडच्या आईचे परळी शहर पोलिस ठाण्यासमोर आंदोलन, प्रकृती खालावली

वाल्मिक कराडची आई पारुबाई कराड यांनी परळी पोलिस ठाण्याबाहेर ठिय्या मांडला आहे. माझ्या लेकाने काही केले नाही. माझ्या लेकाला विनाकारण अडकवत आहेत, तो देवमाणूस आहे, हे सर्व परळीला माहीत आहे, असे त्या म्हणाल्या.

माझ्या लेकाला निर्दोष सोडत नाही, तो पर्यंत पोलिस ठाण्यासमोरून हलणार नाही, असा निर्धार त्यांनी केला. माझ्या लेकाला सोडा, त्याने काही केले नाही, असेही त्यांनी म्हटले. बजरंग सोनवणे, सुरेश धस, संदीप क्षीरसागर यांनी चुकीचे आरोप केलेत. या सर्वांवर कारवाई झाली पाहिजे. त्यांना अटक करून माझ्या लेकरावरील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणीही पारूबाई कराड यांनी केली.  दरम्यान, त्यांची प्रकृती खालावली होती. त्यांना तत्काळ रुग्णालयात नेण्यात आले. 

नवीन एसआसयटी स्थापन

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात लावण्यात आलेली एसआयटी आता बदलण्यात येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जुन्या एसआयटीच्या ठिकाणी आता नवीन एसआयटी स्थापन करण्यात येणार आहे. याबद्दलची माहिती आमदार सुरेश धस यांनी दिली आहे. जुन्या एसआयटीमध्ये वाल्मीक कराडच्या ओळखीचे अधिकारी असल्याचा आरोप करण्यात येत होता त्यामुळे नवीन एसआय टी स्थापन करण्यात आली आहे. 

तीन जणांनी अंगावर पेट्रोल टाकून घेतलं

वाल्मिक कराडच्या समर्थकांचं आज सकाळपासूनच आंदोलन सुरू होतं. सुरुवातीला पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनावेळी एका कार्यकर्त्याला भोवळ आल्याचा प्रकार देखील घडला. दरम्यान वाल्मिक कराड याच्या समर्थनासाठी सुरु असलेल्या या आंदोलनामध्ये त्याची आई देखील सहभागी झाली आहे. मात्र त्यांची देखील प्रकृती खालावली आहे. सकाळपासून तीन जणांनी अंगावर पेट्रोल टाकून पेटून घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान जेव्हा वाल्मिक कराड यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली, त्यानंतर कार्यकर्ते अधिकच आक्रमक झाले आहेत. परळीमध्ये  बेमुदत बंदची हाक देण्यात आली आहे. टायर जाळून निषेध करण्यात आला. तसेच एका बसवर दगडफेक देखील करण्यात आली आहे. त्यानंतर आता हे आंदोलन अधिकच चिरघळलं आहे.  एका कार्यकर्त्यानं चक्क पेटून घेतलं. या घटनेत तो जखमी झाला आहे, त्याच्या पायाला इजा झाली आहे, आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

Tags:

Advertisement

Latest News

पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी पालकमंत्र्यांची यादी जाहीर, धनंजय मुंडेंना धक्का, बीडचे पालकत्व घेतले अजित पवारांनी
पालकमंत्र्यांच्या बाबतीत मोठी बातमी समोर आली आहे.  सर्व जिल्ह्याचे पालकमंत्री पद जाहीर करण्यात आले असून यात अजित पवार हे आता...
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
सोन्याचे दागिने, सोन्याचे घड्याळ; कुंभमेळ्यात आलेले 'गोल्डनबाबा' आहेत कोण?
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Ladki Bahin Yojana : काय सांगताय, प्रतीक्षा संपणार; लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार?
बातमी कामाची : नोकरी करताना कर्मचाऱ्यांनी किती तास काम करावे, काय सांगतो कायदा?
दिल्ली निवडणुकीत भाजपकडून आश्वासनांचा पाऊस; जाणून घ्या काय काय मिळणार