चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा; कोणत्या खेळाडूला संधी अन् कोणाला मिळाला डच्चू
Champions Trophy 2025 : बीसीसीआयने शनिवारी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाची घोषणा केली. रोहित शर्मा संघाचा कर्णधार आहे, तर शुभमन गिल उपकर्णधार असेल. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला एका वर्षानंतर संघात स्थान देण्यात आले. चला तर जाणून घेऊया कोणा-कोणाला मिळाली संधी अन् कोणाला मिळाला डच्चू.
रोहित आणि निवडकर्ता अजित आगरकर यांनी वानखेडे स्टेडियमवर 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. संघात 4 अष्टपैलू खेळाडूंना स्थान मिळाले आहे. यावर रोहितने माध्यमांना सांगितले की, आमच्यासाठी असे पर्याय चांगले आहेत, जे गरज पडल्यास गोलंदाजी आणि फलंदाजी देखील करू शकतात.
19 फेब्रुवारीपासून सामन्यांना प्रारंभ
चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारी ते 9 मार्च दरम्यान पाकिस्तान आणि UAE मधील 4 शहरांमध्ये होणार आहे. यामध्ये लाहोर, कराची, रावळपिंडी आणि दुबईचा समावेश आहे. भारतीय संघाचे सर्व सामने दुबईत होणार आहेत.
एकदिवसीय विश्वचषक संघातील 4 जणांना वगळण्यात आले
2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत खेळणाऱ्या 11 खेळाडूंना संघात संधी मिळाली आहे. यामध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादव यांची नावे आहेत.
विश्वचषक संघात समाविष्ट असलेले सूर्यकुमार यादव, इशान किशन, शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद सिराज यांना वगळण्यात आले आहे. यावेळी चार नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे - ऋषभ पंत, यशस्वी जयस्वाल, वॉशिंग्टन सुंदर आणि अर्शदीप सिंग.
Dhages
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारताचा संघ
- रोहित शर्मा (कर्णधार)
- शुभमन गिल (उपकर्णधार)
- विराट कोहली
- श्रेयस अय्यर
- केएल राहुल
- हार्दिक पंड्या
- अक्षर पटेल
- वॉशिंग्टन सुंदर
- कुलदीप यादव
- जसप्रीत बुमराह
- मोहम्मद शमी
- अर्शदीप सिंग
- यशस्वी जैस्वाल
- ऋषभ पंत
- रवींद्र जडेजा.
23 फेब्रुवारीला पाकिस्तानशी सामना
भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफीतील पहिला सामना बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे. हा सामना 20 फेब्रुवारी रोजी दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाईल. संघाचा दुसरा सामना 23 फेब्रुवारीला पाकिस्तानशी आणि तिसरा सामना 2 मार्चला न्यूझीलंडशी होईल.
भारताला पाकिस्तान, बांगलादेश आणि न्यूझीलंडसह अ गटात ठेवण्यात आले आहे. या स्पर्धेतील दोन उपांत्य फेरीचे सामने 4 आणि 5 मार्च रोजी होतील. तर अंतिम सामना 9 मार्चला होणार आहे.