नीट परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यास पोलिसानेच केली बेदम मारहाण
तोंडात बोळा कोंबला अन् खोलीत नेऊन मारले; नांदेड शहरातील धक्कादायक घटना...!
नांदेडमध्ये NEET परीक्षेची तयारी करणाऱ्या एका 18 वर्षीय विद्यार्थाला पोलीस कर्मचाऱ्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. हॉस्टेलमधील रुममध्ये नेऊन तोंडात रुमालाचा बोळा कोंबून काठीने मारहाण करण्यात आली. नांदेड शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेलमधील ही घटना आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर संबंधित पोलिस शिपायाचं निलंबन करण्यात आलं आहे.
पोलिसांनी मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडिओ समोर येताच या घटनेची दखल घेत भाग्यनगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस कर्मचारी आकाश सावंतसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. याशिवाय पोलीस कर्मचारी आकाश सावंत त्याला सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे.
माहूर तालुक्यातील आसोली येथील प्रथमेश पुरी हा 18 वर्षीय विद्यार्थी नांदेडमध्ये नीट परीक्षेची तयारी करतोय. शहरातील श्रीनगर भागातील एका हॉस्टेल मध्ये तो राहतो. 5 जानेवारी रोजी पोलीस कर्मचारी आकाश सावंत तिथे आला, त्याच्या सोबत क्षितिज कांबळे आणि श्रावण हे अन्य दोन तरुण आले.
Dhages
दुचाकी अन् सोन्याची चेन चोरी केल्याचा आरोप
मोटारसायकल आणि सोन्याची चेन चोरी केली का? असं विचारून तिघांनी प्रथमेशला बाहेर नेले. त्यानंतर, अशोक नगर, गोकुळनगर, आसना नदी परिसरात नेऊन त्याला बेदम मारहाण केली. धक्कादायक बाब म्हणजे, दुसऱ्या दिवशी पुन्हा पोलीस कर्मचारी आकाश सावंत हॉस्टेलवर आला, पुन्हा प्रथमेशच्या तोंडात रुमालाचा बोळा कोंबून त्याला काठीने जबर मारहाण केली.
मुलाच्या वडिलांनी घेतली पोलिस ठाण्यात धाव
घाबरलेल्या मुलाने काही दिवस हा घडलेला प्रकार कोणालाही सांगितला नाही. मात्र, त्याच्या वडिलांना हा प्रकार कळाल्यानंतर त्यांनी थेट भाग्यनगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, त्यावरून पोलिसांनी आरोपी पोलिसांवर गुन्हा दाखल केला.
मारहाणीचा व्हिडिओ समोर येताच घटना उघडकीस
पोलीस कर्मचारी सावंतसह त्याचा मित्र क्षितिज कांबळे यांनी काठी घेऊन प्रथमेशला मारहाण केली, त्या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. याशिवाय दुसऱ्या व्हिडिओत पोलीस कर्मचारी आकाश सावंत हा वर्दीवर आहे. त्यामध्ये, मीच मारहाण केली असं तो बोलताना दिसून येतो. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
दमदाटी करुन विद्यार्थ्यांकडून होतेय पैशांची वसुली
तसेच, अशा पद्धतीने काही युवक विद्यार्थ्यांना दमदाटी करून पैसे वसुली करतात का, किंवा खंडणी घेतात का? या दृष्टीने देखील तपास सुरू असून अशा तक्रारी असल्यास पोलिसांना कळविण्याचं आवाहन पोलीस अधीक्षकांनी केलं आहे. दरम्यान, खासगी कोचिंग क्लासेस, आणि हॉटेल चालकांची बैठक घेऊन याबाबत त्यांची विचार न करण्यात आली. या भागात तक्रार पेढी देखील लावण्यात येणार असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले.