'प्रेमाची गोष्ट' या सिनेमाचा दुसरा भाग येतोय,तब्बल 12 वर्षानंतर!
साल 2013 मध्ये आलेल्या 'प्रेमाची गोष्ट' या सिनेमाची कथा खूपच हृदयस्पर्शी होती.ही कथा म्हणजे दोन घटस्फोटीत व्यक्ती पुन्हा प्रेमात पडण्याची भावनिक कहाणी होती. जी तेव्हाच्याच नाही तर आताचीही पिढीला रिलेट करते. बदलती जीवनशैली, नातेसंबंध, भावनिक चढाओढ, बदलतं प्रेम, रिलेशनशिप्स, परिस्थिती, महत्त्वाकांक्षा यात आजची पिढी पुरती अडकली आहे.त्यातून मैत्री, प्रेम, लग्न, ब्रेकअप, घटस्फोट अशा गोष्टींकडे आजूबाजूची पिढी ही वेगळ्या दृष्टीकोनातून पाहते. आता हीच गोष्ट पुन्हा एकदा नव्या रूपात पाहायला मिळणार आहे.
मुंबई पुणे मुंबई, प्रेमाची गोष्ट, ती सध्या काय करते अशा गाजलेल्या लव्ह स्टोरी सतीश राजवाडे यांच्या दृष्टीकोनातून आपल्या समोर आल्या आहेत. या कथा प्रेक्षकांनाही प्रचंड भावल्या. त्यातून आता सतीश राजवाडे हे 'प्रेमाची गोष्ट 2' हा चित्रपट घेऊन येत आहेत.
चित्रपटाचे निर्माते संजय छाब्रिया म्हणाले, ''प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी आम्ही नेहमीच नव्या धाटणीचे चित्रपट घेऊन येतो. प्रेमकथांमध्ये नेहमीच वेगळं आणि हटके कथानक देऊन प्रेक्षकांचे मन जिंकणारा दिग्दर्शक पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांसाठी नव्या पिढीची प्रेमकथा घेऊन येत आहे. ही केवळ एक प्रेमकथा नसून व्हीएफएक्सच्या थक्क करणाऱ्या दृश्यांसह एक अप्रतिम अनुभव असेल. प्रेक्षकांना ही नवी संकल्पना नक्कीच आवडेल. यात अशी भावना आहे, जी प्रत्येक पिढीला, वयाला आपल्या जवळची वाटेल.''दिग्दर्शक सतीश राजवाडे म्हणाले, ''प्रेक्षकांनी आमच्या आधीच्या चित्रपटांना खूप प्रेम दिले. आता एक अशीच नवी प्रेमकथा 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटात पाहायला मिळेल. काळाबरोबर पुढे जाणं महत्वाचं आहे. त्यामुळे कथानकाचे सादरीकरणही त्याला साजेसं हवं. यात प्रेमकथाच नाही तर तीसादर करायची पद्धतही आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घडवली आहे. त्यामुळे ही प्रेमकथा काळाच्या पुढे जाणारी नवीन युगाची प्रेमकथा ठरणार आहे. प्रेमाची एक वेगळी बाजू यात दिसेल. प्रेम आणि नशीब जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्याचा परिणाम फार वेगळा असतो. प्रेम आणि नशिबाचा हा मनोरंजनात्मक प्रवास प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.'' हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी सांगितले आहे.
Dhages
एव्हरेस्ट एंटरटेनमेंट सादर करत असलेल्या 'प्रेमाची गोष्ट 2' या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश राजवाडे यांनी केले असून निर्माते संजय छाब्रिया आहेत तर सह निर्माते अमित भानुशाली आहेत. हा चित्रपटही प्रेक्षकांसाठी एक खास भेट ठरणार आहे. येत्या जून 2025 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल. प्रेक्षक चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत.