मोठी बातमी : शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला होणार प्रारंभ; 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरू
सुमारे 15 हजार शिक्षकांची भरती होणार
मुंबई : राज्यातील डीएड-बीएड धारक व शिक्षक होऊ इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी असून शिक्षक भरतीच्या दुसऱ्या टप्प्याला लवकरच सुरुवात होणार आहे.
त्यासाठी, 20 जानेवारीपासून पवित्र पोर्टल सुरु होणार आहे. त्यामुळे, शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांना आणखी संधी आली आहे. जिल्हा परिषद शाळांच्या गुणवत्तावाढीसाठी शिक्षकांची संख्या पुरेशी व आवश्यक असून आगामी काळात सेमी इंग्रजीचे वर्ग देखील या शाळांमध्ये सुरू करण्याचे नियोजन आहे.
दरम्यान, अनेक जिल्हा परिषदांमधील शिक्षकांच्या रोस्टरबद्दल तक्रारी होत्या. त्यातील अडचणीही दूर झाल्याने आता लवकरच राज्यात शिक्षकांची मोठी भरती होईल.
१४ ते १५ हजार शिक्षकांची भरती होणार
शिक्षण विभागाने शासनाकडे 14 ते 15 हजार शिक्षकांची भरती करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार, आता शिक्षण विभागाने संबंधित संस्थांकडून जाहिरात मागिवली आहे. त्यामुळे, इच्छुकांना ही नामी संधी आहे.
शिक्षक अभियोग्यता व बुद्धीमता बाचणी-2022 नुसार पवित्र पोर्टलद्वारे पहिल्या टप्यातील पदभरतीची कार्यवाही पूर्ण करण्यात आली आहे.
आता, दुसऱ्या टप्प्यातील पदभरतीकरिता शासन निर्णय दि.10 नोव्हेंबर 2022 नुसार कार्यवाही करावयाची आहे. त्यासाठी येथील शासन निर्णय 14 जानेवारी 2025 नुसार पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक पदभरतीसाठी ऑनलाईन कामाकरीता प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.
त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी व्यवस्थापनांना पोर्टलवर जाहिरात नोंद करण्याची सुविधा 20 जानेवारी 2025 रोजी सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे, संस्थांनी पवित्र पोर्टलवर आपल्या संस्थेतील शिक्षक पदभरतीची माहिती देण्याचं आवाहन करण्यात आलंय.
Dhages
शासन पत्र 10 सप्टेंबर 2024 अन्वये दुसऱ्या टप्प्यातही जिल्हा परिषदेकडेही उर्वरित 10 टक्के रिक्त पदे, पहिल्या फेरीतील अपात्र, गैरहजर, रुजू न झालेले उमेदवार, तसेच अन्य व्यवस्थापनातील रिक्त जागा, इत्यादी बाबी विचारात घेऊन जाहिरात द्यावयाची आहे.
त्यानुसार आपणांस दुसऱ्या टप्यात पदभरती करिता या कार्यालयाचे पत्र 13 सप्टेंबर 2024 अन्वये पुढील कार्यवाहीच्या आवश्यक सविस्तर सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच, जिल्हा परिषदांकडील बिंदुनामावली विषयक माहितीचे प्रमाणपत्र या कार्यालयास उपलब्ध करुन देण्याचेही कळविण्यात आले आहे. सदर माहिती तात्काळ या कार्यालयास सादर करण्यात यावी, अशा आशयाचे पत्र राज्य शिक्षण आयुक्तालयाकडून विभागीय शिक्षणाधिकारी, जिल्हा व तालुकास्तरावरील शिक्षण अधिकाऱ्यांना पाठवण्यात आलं आहे.