1995 नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक मतदानाची टक्केवारी वाढली, नेमका फायदा कुणाला होणार?
एक्झिट पोल आले पण 23 च्या निकालात महायुती की MVA, वाचा 1995 पासूनचे टक्केवारीचे गणित
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदारांनी 30 वर्षांचा मतदानाचा विक्रम मोडीत काढताना भरभरून मतदान केलं आहे. 2024 च्या सर्वात लक्षवेधी आणि पक्षांमध्ये झालेल्या फुट असे असताना देखील 65.1 टक्के मतदानाची नोंद झालेली आहे. विशेष बाब म्हणजे तब्बल तीस वर्षानंतरच्या निवडणुकीत ही सर्वाधिक मतदानाची टक्केवारी आहे. त्यामुळे वाढलेल्या मतांचा नेमका फायदा कोणाला होणार अन् यंदाच्या निवडणुकीत टक्केवारी का वाढली. यावर सविस्तर जाणून घेऊया.
RCC New
मतदानाची टक्केवारी का वाढली?
विधानसभा निवडणुकीच्या काळात महायुती आणि महाविकास आघाडीने एकमेकांवर जोरदार आरोप प्रत्यारोप केले. तर एकप्रकारे आक्रमक प्रचार केल्याचे जाणकारांचे स्पष्ट मत आहे. भाजपच्या 'बटेंगे तो कटेंगे' आणि 'एक है तो सेफ हैं'च्या घोषणांना महाविकास आघाडीने महाराष्ट्र धर्म बिंबवताना उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भावनिक आवाहनाने समर्थकांना घराबाहेर पडण्यास भाग पाडल्याचे जाणकारांचे मत आहे. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2024 मध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत मतदारांची संख्या वाढली आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 8.85 कोटी मतदार होते, जे आता 9.5 टक्क्यांनी वाढून 9.69 कोटी झाले आहेत.
किती वर्षांनी वाढला मतदानाचा टक्का?
2024 च्या विधानसभा निवडणुकीत बंपर मतदानामुळे राज्यातील 100 विधानसभा जागांवर निकराची लढत होण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील मतदारांनीही उत्साहाने मतदान केले होते. याचा फायदा महाविकास आघाडीला झाला होता. त्यामुळे तब्बल 30 वर्षांनी राज्यात मतदानाचा आकडा वाढला आहे. यापूर्वी 1995 मध्ये राज्यात विक्रमी 71.69 टक्के मतदान झाले होते. तेव्हा महाराष्ट्रात पहिल्यांदाच बिगर-काँग्रेस शिवसेना-भाजप युतीचे सरकार स्थापन झाले होते. मात्र, महाराष्ट्रात यावेळी कोणाचे सरकार स्थापन होणार याचा निर्णय 23 नोव्हेंबरला होणार आहे.
वाढलेल्या मतांचा नेमका फायदा कोणाला?
आतापर्यंत झालेल्या निवडणुकीत असा अंदाज लावला गेलेला आहे की, मतदानाचा टक्का वाढला की सत्ता बदलत गेली आहे. मतांची टक्केवारी वाढल्यानंतर सत्ता बदलली किंवा अनेकदा सत्ताधारी पक्षालाच फायदा झालेला आहे. दरम्यान, यंदाच्या अर्थात 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मतदान वाढले आणि महाविकास आघाडीने बाजी मारली. लोकसभा निवडणुकीत राज्यात 61.39 टक्के मतदान झाले होते. महाविकास आघाडीला 43.91 टक्के, तर महायुतीला 42.71 टक्के मते मिळाली होती.
त्यामुळे या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीकडून जो जोरदार प्रचार करण्यात आला त्याचा परिणाम मतदानावरही दिसून आल्याचे मानले जात आहे. राज्यातील मतदानाचा उच्चांक कोल्हापूर जिल्ह्यात झाला असून 76 टक्के मतदान झालं आहे. राज्यातील सर्वाधिक मतदान करवीर विधानसभा मतदारसंघात 84.79 टक्के मतदान झालेले आहे.
2004 मध्ये कित्ती टक्के होते मतदान?
2004 मध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी-काँग्रेस आघाडीला मतदानाच्या टक्केवारीत किंचित वाढ झाल्याचा फायदा झाला होता. 2004 मध्ये 63.44 टक्के मतदान झाले होते. त्यावेळी राष्ट्रवादीला 71 आणि काँग्रेसला 69 जागा मिळाल्या आणि सत्ताधारी आघाडीचे पुनरागमन झाले. शिवसेनेला 62 तर भाजपला 54 जागा मिळाल्या.
2014 मध्ये किती टक्के मतदान?
2014 च्या निवडणुकीतही मतदानात 4 टक्क्यांनी वाढ झाली होती आणि महाराष्ट्रात सरकार बदलले होते. 2014 मध्ये 63.38 टक्के मतदानानंतर भाजप 125 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष ठरला होता. शिवसेनेने स्वतंत्र निवडणूक लढवत 63 जागा जिंकता आल्या. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे मोठे नुकसान झाले होते.
1995 च्या निवडणुकीत काय झाले?
वास्तविक, महाराष्ट्रात 1995 मध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यात झाल्या. 12 फेब्रुवारीला पहिल्या टप्प्यात आणि 9 मार्चला दुसऱ्या टप्प्याचं मतदान झालं. 13 मार्च रोजी निकाल लागला. या निवडणुकीत प्रमुख लढत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस यांच्यात होती. 1995 मध्ये 71.69 टक्के बंपर मतदान झाले होते, तेव्हा जनादेश शिवसेनेच्या बाजूने आला होता. त्यावेळी शिवसेनेचे सरकार स्थापन झाले आणि मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले. त्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती. त्यावेळी गोपीनाथ मुंडे यांनी जोरदार प्रचार भाजपकडून केला होता.